सांगोला : वडिलांच्या उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी गुगलवर शोधलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधणे सांगोल्यातील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने समाजमाध्यमावर पाठविलेली लिंक उघडण्यास सांगितले. या लिंकवर रुग्णाची माहिती भरून केवळ पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर संबंधित महिलेच्या युनियन बँक ऑफ इंडिया खात्यातून तब्बल ५ लाख ८१ हजार ३२२ रुपये परस्पर काढून घेत ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.या प्रकरणी माधुरी मन्मथ बिरगे (रा. मेन रोड, सिदोबा गल्ली, सांगोला) यांनी मंगळवारी (दि. २९) सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी बिरगे यांच्या वडिलांच्या उपचारासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी सोमवारी गुगलवर रुबी हॉस्पिटलचा मोबाइल क्रमांक शोधला. शोधातून मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. समोरील व्यक्तीने आपण रुबी हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगून अपॉइंटमेंटसंदर्भात माहिती घेतली.यानंतर संबंधित व्यक्तीने समाजमाध्यमाच्या माध्यमातून एक लिंक पाठविली. या लिंकवर क्लिक करून रुग्णाची आवश्यक माहिती भरावी आणि अपॉइंटमेंट प्रक्रियेसाठी पाच रुपये ऑनलाइन भरावेत, असे सांगण्यात आले. हॉस्पिटलशी संबंधित व्यक्ती असल्याचे सांगितल्याने बिरगे यांनी त्यावर विश्वास ठेवला.लिंक उघडून आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि ऑनलाइन व्यवहार केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खात्यातून एकूण ५ लाख ८१ हजार ३२२ रुपये परस्पर काढण्यात आल्याचे समोर आले. आपल्या खात्यातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिरगे यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.
या घटनेमुळे ऑनलाइन माध्यमातून हॉस्पिटलची माहिती किंवा संपर्क क्रमांक शोधताना नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. गुगल किंवा समाजमाध्यमांवर आढळणाऱ्या अनोळखी क्रमांकांवर तातडीने विश्वास ठेवणे टाळावे. तसेच अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करणे, वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती भरणे आणि कोणत्याही संशयास्पद लिंकद्वारे ऑनलाइन पेमेंट करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.सांगोला पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, फसवणुकीमागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
फसवणूक झाल्यास त्वरित करावयाची कारवाई
1. राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क:
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित कॉल करा. (पहिल्या २ ते ४ तासांत कॉल केल्यास बँक व्यवहाराला होल्ड लावून पैसे वाचवता येऊ शकतात).
cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.
2. बँक खाती तात्काळ ब्लॉक करा:
संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून खाते, डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि नेट बँकिंग तात्काळ ब्लॉक (Freeze) करा.
3. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार:
सांगोला पोलीस ठाणे अथवा सोलापूर ग्रामीण सायबर सेलकडे जाऊन बँक स्टेटमेंट, आलेले मेसेज/लिंक्स आणि ट्रान्झॅक्शन आयडीसह रीतसर फिर्याद नोंदवा.
घ्यावयाची काळजी
गुगलवर दिसणाऱ्या कोणत्याही अज्ञात क्रमांकावर खात्री केल्याशिवाय संपर्क करू नका; थेट हॉस्पिटलच्या अधिकृत ॲप किंवा मूळ वेबसाइटचाच वापर करा.
डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही एपीके (APK) फाईल किंवा लिंकवर क्लिक करू नका.
अनोळखी व्यक्तीसोबत बँकेचा ओटीपी, पासवर्ड किंवा यूपीआय पिन कधीही शेअर करू नका.
