
सांगोला:सांगोला शहरात पूर्ववैमनस्याच्या कारणातून दैनिक किर्णोदयच्या संपादकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कडलास नाक्यावरून मिरज रोडने जात असताना हा प्रकार घडला.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी हे गेल्या पंधरा वर्षांपासून दैनिक किर्णोदय वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करत असून, ते सदर पत्रिकेचे संपादक आहेत. काही दिवसांपूर्वी सुभाश सुरवसे व बंडू मासाळ यांच्यासोबत किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला होता. याच वादातून आणि आमच्या अध्यक्ष बंडू मासाळा यांना विरोध का करतो, असे म्हणत आरोपींनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हल्ल्याची पार्श्वभूमी:
फिर्यादी हे आपल्या युनिकॉर्न दुचाकीवरून (MH-45-BE-9966) गावाकडे जात असताना, रेल्वे ब्रिजखाली पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या युनिकॉर्न गाडीवरील संतोष सुखदेव लवटे (रा. आनंदनगर, सांगोला) व इतर दोन जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर तिथे आणखी १५ ते २० जण दुचाकीवरून आले.
लोखंडी रॉड, चैन व कोयत्याने बेदम मारहाण:
आरोपींनी संगनमत करून लोखंडी रॉड, लाकडी काठी, लोखंडी चैन, तलवार व कोयत्याने फिर्यादीवर हल्ला केला.
* निखिल जानकर याने लोखंडी रॉडने डोक्यात मारले.
* सागर मोटे याने लाकडी काठीने डोक्यावर घाव घातला.
* बबन जानकर याने लोखंडी चैन पाठीत मारली.
* विशाल जानकर याने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, जो बाजूच्या भिंतीला लागला.
* तसेच धनंजय पवार, धीरज काटे, अरमान शेख, दीपक, कृष्णा व्हरे व इतर चार ते पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी व मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
उपचार सुरू व पोलिसांत फिर्याद:
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादींना विष्णु देशमुख व अस्मीर तांबोळी यांनी मोहन हॉस्पिटल, सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची सविस्तर माहिती:
घटनेची तारीख व वेळ: दिनांक ०९/०९/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ही घटना घडली.
पोलिसात नोंद: दिनांक १०/०९/२०२६ रोजी रात्री १९:०१ वाजता सांगोला पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल (FIR क्र. ०८४७/२०२६) नोंदवण्यात आला.
गुन्ह्याचे स्वरूप: आरोपींनी पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉड, चैन व कोयत्याने प्राणघातक मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कलमे: या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलमांनुसार आणि शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
