

सांगोला : सांगोला शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागे मिरज-पंढरपूर हायवे लगत मोठ्या प्रमाणात हात गाडी दुकाने व टपऱ्या यांचे अतिक्रमण झाले असून यामुळे सदरील रस्त्याच्या वाहतुकीस व रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असून याकडे सांगोल्याचे पोलीस आणि नगरपालिका प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल या निमित्ताने नागरिकांतून विचारला जात आहे. सांगोला शहरातील एसटी स्टँड परिसरात मिरज-पंढरपूर लगत तब्बल १५ ते २० दुकाने त्यामध्ये चार ते पाच हातगाडे व इतर तात्पुरती स्वरूपाचे दुकाने असून यामुळे या परिसरात वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होवून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या हातगाड्याच्या व दुकानाच्या अतिक्रमणामुळे सदरील परिसरात एसटी स्टँड असल्याने एसटी आतमध्ये व बाहेरून येताना कॉर्नरच्या बाजूला पासून सुरू होत असलेल्या या दुकानामुळे मोठ्या प्रमाणे वाहतुकीस त्रास होत आहे. सदरील रस्त्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने या परिसरात दिवसभरात मोठ्या प्रमाणात कॉलेज व शाळेचे विद्यार्थी देखील या परिसरातून जात असल्याने यामुळे नागरिकां सोबत विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत घालून चालावे लागत आहे. अतिक्रमण झालेल्या रस्त्यालगतचे हातगाडे व दुकानांना नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी तात्काळ हटवावे अशी मागणी सांगोला शहरातील नागरिकांतून केली जात आहे. मुळात सदर ठिकाणी सहा महिनेपूर्वी पर्यंतदोन ते तीनच पानपट्ट्या व एक दोन दुकान होतील मात्र मागील सहा महिन्यात या ठिकाणी तब्बल १५ ते २० दुकाने थाटलेली असून तसेच या परिसरात रस्ता देखील अरुंद झालेला असल्याने नागरिकांना चालण्याचे देखील मुश्किल झाले आहे.
सांगोल्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ते सांगोल्यात हजर झाल्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यालगतचे, भले ते दुकान मालकाच्या जागेत असले तरी त्यांचे दुकानाचे बोर्ड काढलेले होते, त्या पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना या परिसरात सुरू असलेली ही दुकाने व टपऱ्यांचे अतिक्रमण दिसत नाही का ? असा प्रश्न सांगोला शहरातील नागरिकांतून पोलिस प्रशासनाला विचारला जात आहे. केवळ गर्दी जमवून कार्यवाही करण्यापेक्षा जिथे खरी गरज आहे त्याठिकाणचे अतिक्रमण पोलिसांनी काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यातील काही दुकानांमध्ये हॉटेलचे व्यवसाय असून त्यामधील दोन ते तीन ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीर देशी दारूची विक्री ही केली जात असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे ही अवैध बेकायदेशीर दारू विक्री आर्थिक लागेबांधे असल्यानेच सुरू असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारीचा व वाहतुकीचा अडथळा निर्माण झालेला आहे. त्यात मद्यपी व गर्दुले यांचा या परिसरात मोठा वावर आहे. सांगोला शहरातील नगरपालिका प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसा पुर्वी सांगोला शहरातील अनेक ठिकाणच्या हातगाडी धारक यांना रस्त्यात अडथळा होत असल्याने अतिक्रमणे काढावी याबाबत नोटीस दिलेली होती. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या दुकाने व टपरीधारकांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. परंतु त्याबाबत पुढे कोणतीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.
सदरील ठिकाणी ज्या दहा ते पंधरा टपऱ्या दुकाने आहेत यातील काही जागा या मीच या जागेचा मालक आहे अशा रीतीने काही स्वयंघोषित जागा मालकांनी यातील जागा भाड्याने देऊन प्रति महिना तीन ते चार हजाररुपये भाडे देखील घेत असल्याचे चर्चा आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार झालेल्या स्वयंघोषित जागामालकांनी या ठिकाणी अतिक्रमण करण्यास मोठा हातभार लावला असल्याचेही बोलले जात आहे.
सांगोला शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागे, मिरज-पंढरपूर हायवे लगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, हे अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली जात आहे.
-
अपघाताचा मोठा धोका: मिरज-पंढरपूर हायवेवर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. एसटी स्टँडच्या पाठीमागील भागात हातगाड्या, दुकाने आणि टपऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
-
अवैध व्यवसाय आणि मद्यविक्री: धक्कादायक बाब म्हणजे, या अतिक्रमित भागातील काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे या परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून, टवाळखोरी आणि अनुचित प्रकारांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे.
-
वाहतुकीची कोंडी: हायवे लगत लागणाऱ्या या गाड्यांमुळे वाहने उभी करायला जागा उरत नाही, परिणामी या भागात वारंवार वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते.
नागरिकांची प्रमुख मागणी:
“या भागातील सर्व अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात यावा. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक पोलीस कारवाई करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल.या प्रकरणी सांगोला नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
वाहतुकीस अडथळा व नागरिकांना रहदारीस मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरणाऱ्या एसटी स्टँडच्या मागील हायवे रस्त्यालगत असलेल्या या टपऱ्या व दुकाने तात्काळ काढून घेऊन सदरील रस्ता अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी सांगोला शहरवासीयातून केली जात आहे. एखादा अपघात व्हायच्या अगोदरच पोलीस प्रशासन व नगरपालिकेने याकडे तात्काळ लक्ष देऊन या टपऱ्या व दुकाने काढून घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. या ठिकाणी जे यातील जे काही कष्टाळू होतकरू व्यावसायिक आहेत त्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून दयावी अशी देखील अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे.
