
सांगोला : सांगोला शहरातील धनगर गल्ली येथील राजमाता पानमसाला स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत १ लाख ५८ हजार २८५रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकान सील करण्यात आले आहे. या प्रकरणात दुकान मालक निशांत उर्फ टिल्ल महादेव मिसाळ वय वर्ष ३२ यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक २६ रोजी दुपारी गस्तीदरम्यान सनगर गल्लीतील या दुकानात प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचे विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाड टाकली. तसेच दुकान बंद असल्याने संबंधितांना बोलावून पंचासमक्ष दुकान उघडण्यात आले.तपासणी दरम्यान डायरेक्टर पानमसाला, आर एम डी पान मसाला, बाबा १२० पानमसाला, विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच तयार मावा असा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला आहे, हा सर्व मुद्देमाल जप्त करून सांगोला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई सांगोला पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत केली असून याबाबतची फिर्याद अन्न प्रशासन अधिकारी उमेशचंद्र भुसे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास चालू आहे.
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे फक्त फार्स असल्याची जोरदार चर्चा सांगोला शहरात सुरु आहे.गेल्या काही महिन्या मध्ये पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्या वर कारवाई केली होती,मात्र आरोपीस अटक न होणे, अटक झाली तर सहजा सहजी जामिनावर बाहेर येणे,असे प्रकार घडत असल्याने गुटखा विक्री करणाऱ्या वर गुन्हे दाखल करून कारवाई करून आरोपीस अटक करून जेल मध्ये गेला आहे असे फार कमी वेळा घडले आहे. विशेष म्हणजे आताच्या कार्यवाही सह यापूर्वी ज्यांच्यावर गेल्या काही दिवसात गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्व प्रमुख पुरवठादार असल्यानेच ते गुन्हे दाखल झाले तरी पुन्हा एकदा जोमाने गुटखा विक्री करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तर दुसरी कडे किरकोळ पान टपरीवर गुटखा विक्री करणाऱ्याना ताबडतोब अटक करून त्यांचेवर कारवाई करताना पोलिस मात्र तत्परता दाखवत त्याना तत्काळ अटक करून दोन तीन महिने जामिन होणार नाही याची दक्षता घेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बड्या व्यापारी यांना एक न्याय व किरकोळ विक्रेता यांना वेगळा न्याय असा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पोलिस व अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्या नंतर आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन मूळ गुटखा पुरवठा दार यांचे पर्यंत पोलिसांचे हात पोहचणार का? की ही कारवाई म्हणजे फक्त फार्सच ठरणार? याकडे सांगोला शहरातील नागरिकाचे लक्ष लागून राहिले आहे.
