

सांगोला : आईचे नावे खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या खरेदी दस्तावर प्राप्त हरकतीचे निकाल तक्रारदार यांच्या बाजुने लावून तक्रारदार यांच्या आईचे नावे केलेल्या खरेदीची नोंद ग्राह धरून त्यांचे नाव सातबारा उता-यावर लावण्यासाठी संगेवाडी मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक यांनी सात हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी मंडल अधिकारी व त्यांचा खाजगी ड्रायव्हर वैभव मोरे रा मुंढेवाडी ता पंढरपूर यांचेविरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,
सांगोला तालुक्यातील तक्रारदाराच्या आईचे नांवे केलेल्या खरेदीची नोंद ग्राहय धरून त्यांचे नांव सात बारा उताऱ्यावर लावण्यासाठी मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक यांच्यावतीने 10,000/- रू लाचेची मागणी करून तडजोडीअंती 7000/- रू. मागणी केली. श्री वैभव पिराजी मोरे यांनी मंडल अधिकारी श्रीमती नाईक यांच्यावतीने केलेल्या लाच मागणीबाबत तक्रारदार सातपुते यांना मंडल अधिकारी श्रीमती नाईक यांच्याकडे पाठवून पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी त्यांचे खाजगी वाहनाचे चालक वैभव मोरे यांच्या मार्फतीने केलेल्या लाच मागणीस दुजोरा देऊन असुद्या मी बोललेय त्यांच्यापाशी, मी काय डायरेक्ट बोलत नाय, मी सांगितलय त्यांच्यापाशी, सांगतो पुन्हा आम्ही अजून तुम्हाला असे म्हणून सदर अपराधास अपप्रेरणा दिली.
त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान मंडल अधिकारी श्रीमती नाईक यांचे खाजगी वाहनाचे चालक श्री वैभव मोरे यांनी तक्रारदार सातपुते यांच्याकडून 7000/- रू लाचेची रक्कम स्वतः स्वीकारले. म्हणून श्रीमती विजया महारूद्र नाईक, वय 45 वर्षे, पद मंडल अधिकारी, नेम सांगोला तहसिल कार्यालय व त्यांचे खाजगी वाहनाचे बालक श्री वैभव पिराजी मोरे, वय 28 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मु.पो मुंढेवाडी, ता. पंढरपुर, जि. सोलापूर यांनी लोकसेवा प्रदान करण्यासाठी आरोपी क्र. 01 यांचे करीता अयोग्यरित्या बेकायदेशीर पारितोषण स्विकारुन गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले आहे म्हणून त्यांचेविरूध्द फिर्याद सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सोलापूर अँटी करप्शनचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करीत आहेत.
सांगोला तालुक्यातील काही ठराविक मंडल अधिकारी व तलाठी हे जनतेची कामे करीत असताना जाणीवपूर्वक हेतूने मुद्दामहून टाळाटाळ करणे, तसेच विनाकारण कामे प्रलंबित ठेवण्याचे प्रकार करत असल्याची चर्चा आहे, अशा प्रकारच्या कामाच्या पद्धतीमुळेच नागरिक हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे सांगोला सर्व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
