सांगोल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा; चार वर्षांची प्रतीक्षा संपली
शुक्रवारी सांगोल्यात शिवशिल्पाची शाही मिरवणूक


सांगोला : गेल्या चार वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा शुक्रवार (ता. 27) रोजी होणार आहे. या दिवशी शहरातून या शिवशिल्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये ढोल पतक, लेझीम पथक, घोडे, उंट, तोफ, मर्दानी खेळ, दांडपट्टा, मल्लखांब, भगवे ध्वज पथक, हालगी पथक, सजीव देखावे, नाशिक ढोल, शाहीर पथक, शिवकालीन देखावे व अनेक पारंपरिक नृत्य सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने दिली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांचा अर्ध पुतळा आहे. त्याच ठिकाणी बाजुला महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी गेल्या चार वर्षापासून शिवप्रेमी मंडळाकडून त्याचे नियोजन केले जात आहे. सर्व शासकीय परवानगी घेऊन गुरुवार (ता. 26) रोजी हे शिवशिल्प कोल्हापूरहून सांगोला येथे आणण्यात आला आहे. सांगोल्यातील अनकढाळ टोल नाक्यावर सर्व शिवभक्त मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार (ता. 27) रोजी जुनोनी, हातीद, पाचेगाव खुर्द, कारंडेवाडी, नाझरा मठ इत्यादी ठिकाणी शिवप्रेमींच्या वतीने स्वागत केले गेले. यावेळी सांगोला शहरातील अंबिका मंदिर येथून ढोल पथक, लेझीम पथक, टाळ पथक, उंट, घोडे यांचा समावेश असलेल्या विविध पारंपारिक खेळ व शाहीर पथक यांच्यासह शहरातून भव्य अशी या शिवशिल्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सांगोला शहरातील भीम नगर, वाढेगाव नाका, वासूद चौक, फुले चौक, नेहरू चौक असे करून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नियोजित स्थळी नेण्यात येणार आहे. आर्किटेक संकेत शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिवशिल्प उभारण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनाय विभागाचे मार्गदर्शनानुसार कोल्हापूर येथील शिल्पकार संताजी चौगुले यांनी हे भव्य शिल्प साकारले आहे.
लोकवर्गणीतून साकारले भव्य शिल्प –
शहरात भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प असावे यासाठी गेले काही वर्षापासून प्रयत्न करण्यात येत होते. त्यासाठी जागा निश्चितीसाठी अनेकांनी आंदोलनही केली होती. नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यानंतर हे भव्य दिव्य शिल्प लोक सहभागातूनच उभारण्यात आले आहे. यासाठी शहरातील शिवप्रेमी तरुण मंडळाने पुढाकार घेतला आहे. शहर व तालुक्यातील अनेकांनी आपल्या मुलांचा, स्वतःचा वाढदिवस टाळून तसेच लग्नकार्य किंवा इतर शुभ मुहूर्तावर अनेक जणांनी या शिल्पासाठी लोक वर्गणी देऊन आपला सहभाग नोंदवला आहे. लोकसहभागातून शहरात उभारण्यात येणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बहुदा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिल्प असल्याचे आज शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याविषयी- शिल्पकार – संताजी चौगुले (कोल्हापूर),मूळ किंमत – २२.५० लाख,पुतळ्याची उंची – १२ फूट, शिल्पसाठी धातू – ब्रांझ,वजन – २.७ टन,कालावधी – चार वर्षं.