बलवडी ते मेथवडे पर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार – आमदार शहाजीबापू पाटील
टेंभूचे पाणी माण नदीत दाखल होणार; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा


सांगोला : खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंभूचे पाणी ३५० क्युसेसने माण नदीत दाखल होणार आहे. टेंभूच्या पाण्याने माण नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्धेहाळ, जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले. त्यावेळी माण नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरीत्या आवर्तन पूर्ण झाले होते. ऐन उन्हाळ्यात माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन टेंभू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. सध्या टेंभूचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावात सुरू असून तलाव शंभर टक्के भरल आहे. आज सकाळी टेंभूचे पाणी घाणंद तलावातून माण नदीत दाखल होणार आहे.
टेंभूच्या पाण्याने माण नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. तसेच बुद्धेहाळ, जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहेत. टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
टेंभूचे पाणी माण नदीत दाखल झाल्याने बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.