डोहाळ जेवण आटोपून घरी परतताना थांबलेल्या दोन कारला टेम्पोची पाठीमागून जोराची धडक तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
सांगोला-महूद रोडवर महुद जवळील दुर्दैवी घटनेत दहा जण जखमी

सांगोला : डोहाळ जेवण आटोपून घरी परतताना थांबलेल्या दोन कारला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील तीन वर्षीय चिमुकल्याचा पंढरपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर या जखमी १० जणांवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यापैकी तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा अपघात बुधवारी रात्री १०.२० च्या सुमारास सांगोला-महूद रोडवर माणिक पाटील यांच्या घरासमोर घडला.
रियांश सागर व्हनमाने (वय ३, रा. गोरेगाव, मुंबई) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. राजेंद्र तुकाराम केसकर, उर्मिला सागर व्हनमाने, सोनाली दादा भानवसे, ललिता विलास केसकर, अथर्व दादा भानवसे, विनायक भारत लवटे, विमल भारत लवटे, नंदाबाई दिलीप बंडगर, पूजा राहुल ढोले, वैशाली नेताजी लवटे (सर्व रा. महूद, केसकर वस्ती) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत, नेताजी मधुकर लवटे यांनी फिर्यादी दिली असून, पोलिसांनी टेम्पोचालक सागर अरुण खरात (रा. चेंबूर, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी नेताजी लवटे यांची पुतणी वर्षा रोहन जानकर हिचा काल बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता. त्या चिमुकल्यासह सारेजण दोन कारमधून वाकी शिवणे येथे गेले होते. डोहाळ जेवण आटोपून रात्री १० च्या सुमारास (एम.एच. ४५/ ए. २०९५) व (एम.एच. ४५/ ए.डी.३१०५) या दोन कारमधून सर्वजण वाकीकडून महूद रोडने केसकरवाडीकडे निघाले होते. वाटेत दोन्ही कार माणिक पाटील यांच्या घरासमोर रोडवर रस्त्याच्या बाजूला थांबवल्या होत्या. दरम्यान, सांगोल्याहून जाणाऱ्या (एम.एच. ०३ / ई.जी. ०५७५) या टेम्पोची कारला (एम.एच.४५ / ए.डी. ३१०५) पाठीमागून जोराची धडक बसली. ही कार पुढे थांबलेल्या (एम. एच. ४५ / ए. २०९५) कारला धडकली. दोन्ही कार पुढे ५० फूट फरफटत नेले.
अपघाताचा आवाज ऐकून संजय कारंडे, विजय पाटील, संतोष पाटील हे दोन्ही कारमधील जखमींना बाहेर काढले. तातडीने उपचाराकरिता महूद येथील रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचाराकरिता पंढरपूर येथे हलविले. दरम्यान, पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रियांश व्हनमाने या चिमुकल्याचा मृत्यू झाला.