खुनाच्या आरोपातुन ६ आरोपी ६ वर्षानंतर निर्दोष मुक्त
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धनंजय माने यांची माहिती

सोलापूर: पडसाळी ता. उत्तर सोलापूर येथे दि. ३१/१०/२०१७ रोजी शेतीच्या वादाच्या कारणावरुन नामदेव ताऊ वडणे याचा मारहाण करुन खुन केल्याच्या आरोपावरुन तुकाराम मारुती शिरसट रा. पडसाळी ता. उत्तर सोलापूर यांचेसह सहा आरोपीविरुध्द भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी ॲडी. सेशन्स जज्ज सोलापूर श्री योगेश राणे यांचेसमोर होऊन न्यायाधिशांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धनंजय माने यांनी दिली.
या खटल्याची हकीकत अशी की, फिर्यादी ताई ज्ञानेश्वर शिरसट व त्यांचे दीर तुकाराम मारुती शिरसट यांचे मध्ये वडिलार्जित जमिनीबद्दल अनेक वर्षापासुन वाद होता. दिवाणी न्यायालय व महसुल न्यायालयात एकमेकांविरुध्द दावे दाखल करण्यात आले होते. दि. ३१/१०/२०१७ रोजी वादातील जमिनीत तुकाराम मारुती शिरसट हा पेरणी करत असताना फिर्यादी ताई शिरसट, तिचे वडील नामदेव वडणे रा. माळुंब्रा ता. तुळजापूर, भाऊ नानासाहेब वडणे, शरद वडणे यांनी हरकत घेतली. त्यावेळी झालेल्या भांडणात आरोपी तुकाराम शिरसट, हर्षद शिरसट, सुलबा शिरसट, सुर्यकांत करंडे, गैनीनाथ राऊत, शालन करंडे यांनी नामदेव वडणे, नानासाहेब वडणे, शरद वडणे यांना काठी व लाथाबुक्क्याने मारहाण केली. जखमी नामदेव वडणे यांना शासकीय रुग्णालय सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. त्यांची मुलगी ताई शिरसट यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीचा तपास पुर्ण झाल्यानंतर २०१८ मध्ये पोलिसांनी सर्व आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील ॲड. धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, नामदेव वडणे यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे ही बाब वैद्यकीय पुराव्यावरुन स्पष्ट होते. त्यांचा मृत्युचा गैरफायदा घेऊन पुर्व वैमनस्यावरुन विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने ,ॲड. विकास मोटे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड. दत्तुसिंह पवार यांनी काम पाहिले.मयत नामदेव यांचा मृत्यु हृदयविकाराने झालेला असुन देखील आरोपींना पुर्व वैमनस्यातुन द्वेष भावनेने विनाकारण गुंतवल्यामुळे ६ वर्ष न्यायालयीन लढाईत झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल आरोपींतर्फे फिर्यादी विरुध्द ६ लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याबाबत मॅलिशिअस प्रॉसीक्यूशनचा दावा लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.