जप्त मुद्देमालावर “कारकूनानेच मारला डल्ला”!
तत्कालीन सहाय्यक फौजदाराने जप्त मुद्देमालाची 7 लाख 85 हजाराची रक्कम केली गायब कारकुन आरोपी फरार


सांगोला : सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल नगदी कारकून सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतिफ अमरुद्दिन मुजावर यांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची 7 लाख 85 हजार 969 रुपयाची रक्कम शासनास जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता स्वतःकडे ठेवून अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करीत आहेत. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून त्याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.ज्यांच्याकडे रक्षणाची जबाबदारी असते त्यांनीच जप्त मुद्देमालावर डल्ला मारल्यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती रुजली आहेत हे दिसून येते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सपोफौ अब्दुल लतिफ अमरुद्दिन मुजावर हा सांगोला पोलीस ठाण्यात नगदी कारकुन म्हणून सन 2016 ते 2020 या कालावधीत कार्यरत असताना वेगवेगळ्या तपासी अमलदारांनी भाग 6 च्या गुन्ह्यात कायदेशीर जमा झालेला जप्त मुद्देमाल मुजावर यांच्या कडे जमा केला.
त्यानी भाग 6 गुन्हयाचे मुद्देमाल रजिस्टर प्रमाणीत करुन घेणे आवश्यक असताना प्रमाणीत न करुन घेता त्यामध्ये वेगवेगळया एमआर नंबरप्रमाणे नोंदी केल्या. गुन्हयात जप्त रकमा त्यानी जमा करुन संबंधीत अंमलदार यांना त्याचे एमआर नंबर दिले. असे एकुण 143 एमआर नंबरमध्ये एकुण 7,85,969/- रु इतकी रक्कम जमा करुन घेतली. सदर रक्कम वेळोवेळी चलनाने मुदतीत शासनास विहीत मुदतीत भरणा केली नाही. त्यानंतर सपोफौ. मुजावर हे बदलुन गेल्यानंतर पोशि. सुमित पिसे सांगोला पोलीस ठाणे यांच्याकडे 30,000रु आणि 40,000 रु अशी दोनदा फोन पे पाठविले. सदरची रक्कम पोकॉ. पिसे यांनी चलनाने शासनास भरणा केली. सदरची एकुण 143 एमआर नंबरमधील संपूर्ण 7,85,969/- रु इतकी रक्कम शासनास विहीत पध्दतीने मुदतीत तात्काळ न जमा करता फौजदारीपात्र न्यासभंग करण्याच्या इरादयाने स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता स्वतःकडे ठेवुन घेवुन त्याचा अपहार केला व शासनाची फसवणुक केली म्हणून तत्कालीन नगदी कारकुन सपोफो अब्दुल लतीफ अमरुद्दीन मुजावर यांच्याविरुध्द फसवणुकीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून आरोपीच्या शोधासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले असून या पथकाने सोलापूर, राहत्या गावी अक्कलकोट या ठिकाणी कसून शोध घेतला परंतु आरोपी अद्याप मिळून आला नाही पोलीस पथकाने आरोपीच्या शोधासाठी कंबर कसली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. एका पोलिसानेच फुल ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल धापल्यामुळे याबाबत सगळीकडे चर्चा होत आहे.