वाढेगांव – सांगोला रस्त्याची दयनीय अवस्था; प्रशासन मोठया अपघाताची वाट बघत आहे काय? वाहन चालकाचा संतप्त सवाल


वाढेगांव – सांगोला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. प्रशासन आता एखादा मोठा अपघात व्हायची वाट बघत आहे का ? असा संतप्त सवाल वाहनचालकातून केला जात आहे.
वाढेगांव : सांगोला या रस्त्यावरून मंगळवेढा, लक्ष्मी दहिवडी, राजापूर, सावे, मेडशिंगी, आलेगाव तसेच या भागातील शाळेचे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुर यांची या मार्गावरून दैनंदिन ये-जा सुरु असते. मात्र सद्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर चढ-उतार झाल्याने वाहने व्यवस्थीत चालवता येत नाही परिणामी गाडीवरील ताबा सुटून किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्याच्या बाजुला वाढलेली झाडे- झुडपे व रोडवरील अतिक्रमणे यामुळे रस्ता अरूंद झाल्याने वाहनचालकाना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची कसलीच डागडुजी झाली नाही. महामार्गाचे काम करताना सर्व अवजड वाहतूक याच रस्त्याने होत होती. सबंधित कंपनीने या रस्त्याची डागडुजी करुन द्यायला हवी होती मात्र तसे कोणतेच काम यांनी केले नाही आणि रस्त्याला मोठे खड्डे पडत गेले. तसेच वाढेगांव – सांगोला या रोडवरील पुलाचीही दुरावस्था झाली असून पाण्याचा निचरा होणाऱ्या पाईप मातीने तुंबल्यामुळे या पुलावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे. शिवाय या पुलाच्या संरक्षक लोखंडी पाईप निघाल्या आहेत, पुलाच्या कठड्यात मोठी झाडी आल्याने पुलाच्या बांधकामास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याचे काम सुरु होणार आहे अशी नुसती चर्चा आहे मात्र प्रशासन एखादा मोठा अपघात घडल्यावरच या रस्त्याचे काम करणार का ? असा संतप्त वाहनचालक, प्रवाशी वर्गातून केला जात आहे.