जिल्हास्तरीय पथकाकडून मौजे शिराळा-टेंभुर्णी ता.माढा येथील अवैध वाळू उत्खननांवर कारवाई; 131.9 ब्रास वाळू साठा जप्त
माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत 123 प्रकरणात 78.93 कोटीचा दंड वसूली, 16 वाहने जप्त तर 28 गुन्हे दाखल

सोलापूर : गौण खनिजाच्या अवैध वाहतूक, उत्खनन व साठ्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1960 मधील कलम 48 (7) नुसार गौण खनिजाच्या बाजार मुल्याच्या पाच टक्यांपर्यंत दंडाच्या रकमेची परिगणना करून नियमानुसार स्वामित्वधन व दंडाची रक्कम वसुल करण्याची, तसेच कलम 48 (8) नुसार अवैध उत्खननाकरीता वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री व वाहतुकीकरिता वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्याची तरतुद आहे. यानुसार सोलापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठा प्रकरणांत कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा स्तरावर व तहसिल स्तरावर गठित करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समितीमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हास्तरीय पथकाकडून मौजे शिराळा-टेंभुर्णी ता.माढा येथील अवैध वाळू उत्खनन चालू असल्याचे प्राप्त गोपनीय माहितीवरून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये साधारण 131.9 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात येऊन, संबंधित अवैध वाळू उत्खनन करून साठा करण्यावर तहसिलदार माढा यांचेस्तरावरून दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात अवैध गौण खनिजाच्या विविध प्रकरणांत एप्रिल 2024 ते जुलै 2024 अखेर पर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अवैध वाहतूक व उत्खननच्या आढळून आलेल्या एकुण प्रकरणे 123 आहेत. सदर प्रकरणांत एकुण रक्कत रुपये 78.93 कोटी दंड आकारण्यात आलेला आहे. सदर दंडात्मक कारवाई व्यतीरिक्त फौजदारी कारवाईमध्ये वरील नमुद कालावधीत एकुण 28 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीच्या विविध प्रकरणांत वापर करण्यात आलेले एकुण 16 वाहने इतर 3 यंत्रसामग्री जप्त करण्यात आलेली आहेत.