पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडे स्वाधीन
गाडीच्या नंबरवरून आला संशयः पाठलाग करून पकडले

सांगोला :कडलास (ता. सांगोला) येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन चोरीच्या दुचाकींसह पकडून रात्र गस्तीवरील पोलिसांच्या स्वाधीन केले. पेट्रोल पंपावरील कामगार दत्तात्रय संजय पवार (रा. कडलास) या युवकाने मोठ्या शिताफीने दुचाकी चोरट्यांना पकडून कामगिरी केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दोन अल्पवयीन मुलांनी सांगोला स्टेशन रोड व कडलास (पवारवाडी) येथून चोरलेल्या दोन दुचाकी कडलास येथील विजय गव्हाणे यांच्या पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री १०:१५ वाजता घेऊन आले होते. त्याठिकाणी दोन मुले दुचाकीतील पेट्रेल काढताना कर्मचारी पवार याने पाहून त्यांच्याकडे नाव, गाव अधिक चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या व त्यांच्याकडील एम. एच. ४५ एक्स-४९८७ या दुचाकीचा नंबर ओळखून त्याने अरुण गायकवाड यांना फोन करून तुम्ही दुचाकी कोणाला दिली आहे का? अशी विचारणा केली असता त्यांनी माझी दुचाकी सांगोल्यातून चोरीला गेल्याचे सांगितले. तोपर्यंत त्या अल्पवयीन मुलांनी एक दुचाकी पंपावर ठेवून सांगोला रस्त्याने धम ठोकली. दत्ता पवार यांनी इतरांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून सांगोला रोडवरील एका पिकअप शेडमध्ये दोघांना पकडले. मात्र, त्यावेळी त्यांच्यासमवेत आणखी असणाऱ्या दोघांनी तेथून धूम ठोकली. त्यानंतर विजय गव्हाणे यांनी पंपावर ग्रामस्थांकडून मुलांना मारहाण न होऊ देता त्यांच्याकडे विचारणा केली. कडलास येथून पकडलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडे चौकशी करून घेरडी येथून एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या असून अजून बऱ्याच चोरीच्या दुचाकी मिळणार आहेत. -भीमराव खणदाळे, पोलिस निरीक्षक, सांगोला.
दुचाकीमागे ३ हजार रुपये.. मुलांनी बुधवारी दिवसभरात सांगोला शहर, कडलास व जत येथून तब्बल ६ ते ७ दुचाकी चोरल्याचे सांगितले व चोरीच्या दुचाकी पुढे घेरडी येथील हातेकर नामक व्यक्तीला दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येक दुचाकीमागे मुलांना ३ हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले. सध्या पोलिसांच्या ताब्यात त्या दोन अल्पवयीन मुलांसह चोरीच्या दुचाकी घेणारा घेरडीतील हातेकर ताब्यात असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.