सांगोला शहर विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर व सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सांगोल्यात जाहीर सभा


सांगोला : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गट आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आणण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन सांगोल्यात करण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिली.
ही सभा रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार असून या सभेद्वारे प्रभागनिहाय भाजप-शेकाप व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ मिळणार असून मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. शहरात या सभेची तयारी जोमात सुरू असून पक्षाचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत सभेची माहिती पोहोचवण्याचे काम करत आहेत.
स्थानीक स्तरावरील विविध विकासकामे, आगामी धोरणे व निवडणुकीतील पक्षाची भूमिका या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे या सभेत मांडले जाण्याची शक्यता असून सांगोल्यातील राजकीय वातावरणाला यामुळे आणखी रंग चढणार आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेची घोषणा होताच राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. ही सभा होताच सांगोल्यातील नगरपालिकेच्या निवडणूक समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.सांगोला शहरात आधीच विविध पक्षांची प्रचार सभा रंगत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमनाने उत्साह, ऊर्जा आणि राजकीय तापमान दोन्ही चढले आहे. नागरिकांमध्येही या सभेबाबत उत्सुकता पाहायला मिळत असून, सभा झाल्यानंतर सांगोल्याचे वातावरण कोणत्या दिशेने वळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी सांगोला शहरातील भाजप, शेकाप व दिपकआबा साळुंखे पाटील गट व मित्र पक्षाच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत व उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी केले आहे.