ताजे अपडेटराजकारण

निवडणुक व्यक्तीवर टिका करण्यापेक्षा सांगोला शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर लढा – ना. जयकुमार गोरे

सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ व पदयात्रा उत्साहात संपन्न

Spread the love

सांगोला : भाजप, शेकाप व दिपकआबा गटाचे आमचे पॅनेल आले तर सांगोल्याला काहीही कमी पडू देणार नाही सांगोला शहराचा विकास करायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत रहावे लागेल. सांगोला शहराच्या विकासासाठी लागेल तो पैसा, लागेल ती व्यवस्थी देण्याची क्षमता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगोला शहराचा विकास करु शकतील. त्यामुळे ही निवडणुक व्यक्तीवर टिका करण्यापेक्षा सांगोला शहराच्या विकासाच्या मुद्दयावर लढूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि भव्य पदयात्रा शनिवारी उत्साहात पार पडली. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते प्रचाराचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभानंतर आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे रुपांतर अंबिकादेवी मंदिराच्या प्रागणांत सभेत झाले. यावेळी ना. जयकुमार गोरे बोलत होते. याप्रसंगी आ.डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, चेतनसिंह केदारसावंत, बाळासाहेब एरंडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर व सर्व उमेदवार यांच्यासह शेकाप, भाजप व दिपकआबा गटांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. आमची लढाई ही कुणाला एकटे पाडण्यासाठी नाही, आमची लढाई कुणाचे दुकान बंद करण्यासाठी नाही तर आमची आघाडी सांगोला शहराच्या विकासाची आहे, शहरवासियांना जे आवश्यक आहे ते देण्यासाठी आमची आघाडी आहे. इथे विचाराचा विषय नाही इथे विकासांचा विषय आहे. आमच्या सर्वांचे वेगवेगळे विचार जरी असले तरी सांगोला नगरपालिकेची आघाडी करताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असून कोणालाही नाराज करुन, प्रेशर टाकून आघाडी केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही भाजपा सांगोला शहरासोबत आहोत त्यामुळे आता शहराच्या विकास कामांची चिता करायचे काही काम नाही, सांगोला शहराचा विकास करायचा असेल तर देवाभाऊ शिवाय पर्याय नाही. शेवटी विकासाला निधी लागतो. त्यामुळे निधी देण्याची क्षमता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे आहे त्यामुळे आपले मारुती आबा कुठल्याही व कसल्याची परिस्थितीत नगराध्यक्ष झाले पाहिजेत. नगरपालिकेला आमचे पॅनेल आले तर कुणालाही कसलीही अडचण येणार नाही आणि काहीही कमी पडू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गोरे यांनी दिली.

      स्व. आबासाहेबांनी राजकारण करत असताना या महाराष्ट्राला अनेक आदर्श घालून दिले आहेत. शेकापचा विचार वाढवत असताना जेव्हा जेव्हा तालुक्याच्या विकासासाठी कुणाची मदत घ्यायची असेल तर आबासाहेबांनी कधीही मागे पुढे बघितले नाही, माझा तालुका, माझी माणसे, माझ्या लोकाचे काम प्रथम ही भूमिका आबासाहेबांनी पहिल्यांदा घेतली आहे. आबासाहेबांनी जे नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत जोडले ते नाते आजही आदराने सांगत असून आबासाहेबांच्या नातवांना जपा अशी आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याचे आवर्जुन त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीच्या आपल्या आघाडीच्या निर्णयानंतर शांतता बिघडवण्याचे काम काही लोकांनी केले. शहराच्या विकासासाठी शेकाप अणि भाजप आणि दिपक आबा एकत्रीत आल्यानंतर काही स्वच्छ आणि जनतेच्या मनातील चेहरा म्हणून मारुतीआबांना उमेदवारी- ना. जयकुमार गोरे मारुतीआबांनी स्व. आबासाहेबांसोबत काम केले आहे. सोबत राहून नुसते कामच केले नाही तर व्यक्तीगत स्वतःचेही वेगळे व्यक्तीमत्व तयार केले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार निवडला आहे. मारुती आबांनी कुणाला लुटले नाही, त्यांच्यावर टक्केवारी, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, अशा सज्जन माणसाला शहराच्या विकासाच्या दृष्टीने नेतृत्व दिले आहे. जणांना वाईट वाटत असेल तर खुशाल वाईट वाटुद्या. आम्हाला फक्त विकासाचे काम करायचे आहे, मला कुणावर टीका करायची नाही आणि चिमटेही काढायचे नाहीत. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी विकास आघाडी केली आहे. विरोधकांकडून मागच्या २ वर्षात जे शब्द दिले ते कागदावरच राहिले आहेत. यापुढील काळात सर्वसामान्य जनतेचे कोणाचेही काम मागे राहणार नाही अशी ग्वाही देत सर्वांनी पॅनेल टू पॅनेल काम करावे, असे आवाहन करुन रात्रीचा दिवस करत डोळ्यात तेल घालून आपल्या उमेदवारांना निवडून आणावे, असे सांगितले. यावेळी यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका