उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगोल्यात; नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने व सर्व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा; प्रचाराचा नारळ फुटणार


सांगोला : सांगोला नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोठी ताकद दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून शहरात याची मोठी चर्चा सुरू आहे. ही सभा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने व सर्व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ यांनी दिली.
सभेचे आयोजन आज रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन सांगोला विधानसभेचे मा.आम. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले जात असून, शहरातील शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. शहरातील शिवसैनिकांनी सभेच्या तयारीसाठी मोहीम राबवली असून पोस्टर, सोशल मीडिया अपडेट्स आणि जनसंपर्क मोहिमेची मोठी चळवळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमुळे निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना फ ायदा होणार असून यामुळे सांगोला नगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक बदलू शकतात, असे चित्र सध्या दिसून येत आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप शेकाप व दीपकआबा गटांच्या एकत्रीकरणामुळे राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे सर्वत्र बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) सांगोल्यात काही प्रमाणात एकाकी पडत आहे असे वाटले होते परंतु प्रचारामध्ये नगराध्यक्ष आणि २३ नगरसेवकांनी मोठी आघाडी घेतली आहे. यावर ना. एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
तरी सांगोला शहर व तालुका परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांनी केले आहे.