सांगोल्यातील वाईन शॉप विरोधात नागरिक आणि व्यापारी आक्रमक ; शाळा आणि धार्मिक स्थळापासून जवळ असलेले वाईन शॉप स्थलांतरित करण्याची मागणी
नागरिकाच्या तक्रारी वरून नगरपालिकेने सदरील वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे नागरिकांचीआग्रही मागणी

सांगोला : सांगोला शहरात मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या संगम ब्रँडी वाईन शॉप या दुकानाविरोधात सांगोला शहरातील व्यापारी आणि नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धार्मिक स्थळ तसेच शाळेपासून जवळ असलेल्या या दारूच्या दुकानामुळे व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने हे वाईन शॉप इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी शहरातील प्रसिद्ध व्यापारी राजकुमार घोंगडे यांच्यासह सुमारे २० ते २५ व्यापाऱ्यांनी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र दिन अर्थात १ मे पूर्वी संबंधित विभागाने संगम ब्रँडी या वाईन शॉप विरोधात ठोस कारवाई न केल्यास या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना घेऊन आम्ही स्वतः सदरचे बेकायदेशीर रित्या सुरू असणारे दुकान बंद करून याच्या विरोधात उपोषणाचा मार्ग स्वीकारू असा इशाराही व्यापारी राजकुमार घोंगडे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे सदरील दुकान या ठिकाणी सुरू करताना नगरपालिकेची व लगतदार नागरिकांची कोणतीही ना हरकत घेतली नसल्याचे समजते.त्यामुळे नागरिकाच्या तक्रारी वरून नगरपालिकेने सदरील वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे अशी आग्रही मागणी सांगोला शहर वासियांतून केली जात आहे.
सांगोला शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या स्टेशन रोडवर जुन्या स्टेट बँकेशेजारी संगम ब्रँडी हे वाईन शॉप सुरू आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मुख्य रस्त्यापासून ५०० मीटरच्या आत अशा प्रकारची दुकाने सुरू करण्यात येऊ नयेत अशी अट घातल्यानंतर हे दुकान महात्मा फुले चौकातून जुन्या स्टेट बँकेशेजारी आले होते. याबाबत परिसरातील नागरिकांच्या असंख्य तक्रारी असूनही हे दुकान या परिसरात सुरू करण्यात आले होते. यावेळी संबंधित दुकानाच्या मालकांनी सदरचे दुकान काही महिनेच इथे ठेवणार असून पुन्हा हे इतरत्र सुरू करण्याचे आश्वासन या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिले होते. परंतु या गोष्टीला आता तब्बल ७ ते ८ वर्षे उलटली तरीही सांगोला शहराच्या ऐन व्यापारी पेठेत हे दुकान सुरूच असल्याने या परिसरात दररोज दारू पिणाऱ्या लोकांच्या असंख्य तक्रारी नशेत अश्लील शिवीगाळ मारहाण यासारखे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे या दारूच्या दुकानाला पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच वाहने लावून नागरिक गर्दी करत असतात यामुळे किरकोळ अपघात वाद निर्माण होत असल्याचे चित्र नागरिकांना दररोज पाहायला मिळत आहे. संगम ब्रँडी या दुकानापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर सांगोला शहरातील नागरिकांचे ग्रामदैवत असणारे म्हसोबा देवस्थान आहे. तसेच या परिसरातच श्री दत्त मंदिर, नृसिंह मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मुस्लिम समाज बांधवांची प्रार्थना स्थळ असणारी मस्जिद असतानाही बेकायदेशीररित्या संगम ब्रँडी हे दारूचे दुकान सुरू असल्याचे या लेखी निवेदनाद्वारे परिसरातील व्यापारी व नागरिकांनी म्हटले आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी..
या दारू विक्री दुकानावर कार्यवाहीची मागणी नागरिकांनी केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरील दुकान या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करणेकामी कार्यवाही करणे अपेक्षित असताना उलटपक्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानाच्या समोर असलेल्या हातगाडीवर चालक असलेल्या दुकानदारालाच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणेबाबतची लेखी नोटीस दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या दुकानाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या दुकानावर कोणतीच ठोस कार्यवाही न करता चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभारावरच प्रश्नचिन्ह..
सांगोला शहर व तालुक्यातील अनेक बिअर शॉपी मध्ये परमिट रूमच्या सुविधा पुरवल्या जात असून सर्रास बिअर शॉपीमध्ये टेबल वर बसून बिअर पिण्याची सोय केलेली असून देशी दारू तर तालुक्यातील खेडोपाडी सहजच मिळत असल्याने खेडोपाडी देशी दारू विक्रीचे पेव सुटलेले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व अधिकारीच अवैद्य दारू विक्री करणाऱ्या बरोबरच फि रत असलेने या विभागाच्या एकुण कारभारावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत लवकरच काही जाणकार या खात्याचे मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून हा सर्व प्रकार त्यांच्या निर्देशनास आणून देणार असल्याचे समजते.
याबाबत सांगोला नगरपरिषदेस लेखी निवेदन प्राप्त झाले आहे. या दुकानात येणाऱ्या मद्यपीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे नमूद आहे. सदरचा विषय राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित असल्याने संगम ब्रँडी या वाईन शॉप दुकानावर कारवाई करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक, सोलापूर यांना लेखी पत्र काढून आम्ही कळवले आहे. – डॉ सुधीर गवळी, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊ……..
सांगोला शहरातील संगम ब्रँडी या वाईन शॉप विरोधात परिसरातील व्यापारी आणि नागरिकांची तक्रार असेल तर येथील स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून नागरिकांचे समाधान होईल अशा पद्धतीची कायदेशीर कार्यवाही करण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल.-पंकज कुंभार,पोलीस निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग