पैशाच्या कारणावरून खून; मुंबई उच्च न्यायालयात जामीन


सोलापूर :पैशाच्या कारणावरून चंद्रकांत बाबा पवार (रा. कान्हापुरी, ता. पंढरपूर) याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर याची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
आरोपी मुटेकर याच्या घरी पत्रे ठोकण्याच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून त्याच्यात व चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यामुळे चिडून आरोपी मुटेकर याने बेंबळे ते अकोले बुद्रुक रोडवर चंद्रकांत पवार याचा डोक्यात दगडाने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह उसाच्या शेतीचे बांधालगत खड्ड्यात टाकून दिला होता, या आरोपावरून आरोपी मुटेकर यास टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली होती.
मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी, दोषारोपत्रात आरोपीविरुध्द सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह नाही, असा युक्तिवाद केला. न्यायमूर्तीनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मुटेकर याचा जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे अॅड. पी.पी. देवकर यांनी काम पाहिले.