ऐन दिवाळीत सांगोल्याच्या आठवडा बाजारात स्वच्छतेचा बोजवारा! दुर्गंधीने व्यापारी, नागरिक त्रस्त; लोकांच्या जीवाशी खेळ
नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ठेकेदारावर अवलंबून न राहता आठवडा बाजार परिसर तात्काळ स्वच्छ करावा नागरिकांतून मागणी

सांगोला : सांगोला शहरात रविवारी भरणारा आठवडा बाजार राज्यभर नावलौकिक असलेला बाजार म्हणून परिचित आहे. पंरतु गेल्या काही महिन्यापासून बाजारातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नागरिक व व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
दिवाळी सारखा सण तोंडावर आला असताना वाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढणार आहे, व्यापारीही यंदा तरी उलाढाल चांगली होईल या अपेक्षेने नवीन साहित्य व माल विक्रीसाठी धडपत आहे. याउलट मात्र आठवडा बाजार परिसरात शुभमांगल्याच्या सणाच्या कालावधीत ‘कचरा व घाणीचे’ दर्शन होत आहे.

सांगोल्यात भलामोठा आठवडा बाजार परिसर असून लाखो रुपये खर्च करून विकास कामे झाले, परंतु स्वच्छता व देखरेख आवश्यकते प्रमाणे होत नाही, मग विकास कामे करूनही नागरिकांना व व्यापारी वर्गाला हकनाक त्रास सहन करावा लागतो. नुसती विकास कामाच्या ‘खर्चाची घाई’ कश्याला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाजारात भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणली जातात, पण बाजारातील परिसरात ‘अस्वच्छता’ असेलतर नागिरकांच्या जीवाशी खेळ कोणाच्या हलगर्जीपणा होत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सणासुदीच्या कालावधीत अस्वछता असणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे असल्याने बाजार परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे. अनेक दिवसांपासून आठवडा बाजार परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला असून “स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला” अशी पेपरबाजी करण्यावर भर देणाऱ्या नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने ठेकेदारावर अवलंबून न राहता आठवडा बाजार परिसर तात्काळ स्वच्छ करावा अशी अपेक्षा सांगोला तालुक्यातील नागरिक व व्यापारी वर्गातून केली जात आहे.