सांगोल्यात स्व.गणपतराव देशमुखांच्या दोन नातवांमधील वाद मिटला, अखेर डॉक्टर बंधू मध्ये मनोमिलन!
उद्या शेकापच्या सांगोला येथील मेळाव्यात उमेदवाराची होणार घोषणा

सांगोला : विधानसभेची जागा ही पारंपारिक शेतकरी कामगार पक्षाकडे असताना महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाला दिल्याने आता शेतकरी कामगार पक्ष हा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या सांगोल्यात मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे दोन नातू डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात सुरू असलेला वाद मिटणार असून दोघांचे मनोमिलन होणार आहे. उद्याच्या शेकाप मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हेच उमेदवार असणार असून त्याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष या निमित्ताने प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
सांगोल्याच्या उमेदवारीसाठी स्वर्गीय गणपतरावांचे नातू डॉ. अनिकेत व डॉ. बाबासाहेब या दोन भावंडात सुप्त संघर्ष सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले होते. मात्र, हा दोघांमधील वाद मिटत नव्हता. दरम्यान हा वाद संपण्यास आज शेवटी या दोघांची आजी स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी श्रीमती रतनबाई देशमुख यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत दोघांचे मनोमिलन घडवून आणले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याच घरात ही छोटी काही बैठक थोड्या वेळापूर्वी संपन्न होऊन श्रीमती रतनबाई यांनी दोघातले वाद संपवलेे. आता उद्या होणाऱ्या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष एक संघरतीने एकत्रित येत असून सांगोला विधानसभा पूर्ण ताकतीने लढवण्याची तयारी करण्यात आली आहे.