दिपकआबा साळुंखे पाटील हे महाविकास आघाडीचे सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
आबांना तुम्ही आमदार करा आम्ही मंत्री करतो ; खा संजय राऊत यांची ग्वाही

सांगोला : शिवसेना पक्षाविषयी काही राजकीय नेत्यांनी घेतलेली वेगळी भूमिका महाराष्ट्राला अजिबात आवडली नाही. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील अंधःकार जाळण्यासाठी मी आज दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हातात सांगोला विधानसभेची उमेदवारी जाहीर करून शिवसेनेची धगधगती मशाल देत आहे. दिपकआबा जिल्ह्यातील अंधःकार दूर करून विकासाचा नवीन दिपक घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात नक्कीच उदयाला येतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शुक्रवार दि १७ रोजी शिवसेना ठाकरे गटात आपल्या हजारो समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. माजी आमदार दिपकआबांचे पक्षात स्वागत करून त्यांची सांगोला विधानसभेची उमेदवारी घोषित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खा संजय राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा अनिल देसाई, संपर्क प्रमुख अनिल कोकीळ माजी खा विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, तालुका प्रमुख अरविंद पाटील कमरुद्दिन खतीब, शहर प्रमुख तुषार इंगळे भारत गवळी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे समर्थक पदाधिकारी आणि हजारो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, २०१९ रोजी झालेल्या सांगोला विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार म्हणून सांगोलकरांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांना अद्दल घडविण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हातात निष्ठेची आणि परिवर्तनाची मशाल देत आहे मला विश्वास आहे सांगोलकर नक्कीच या मशालीचा प्रकाश सबंध तालुक्यात पसरवतील आणि विरोधकांना कायमस्वरुपी घरी बसवतील असा विश्वास व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची महाविकास आघाडीतून मशाल या चिन्हावर सांगोला विधानसभेचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषणा केली.
दरम्यान यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या समवेत ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील शिवाजीराव बनकर मधुकर बनसोडे विजय राऊत विजय येलपले विजय पवार चंद्रकांत चौगुले अनिल खटकाळे नंदकुमार दिघे सतीश काशीद नाथा जाधव सतीश सावंत अनिल साळुंखे शहाजी हातेकर अशोक माने बाबुराव नागणे विजयसिंह खबाले शिवाजी जावीर चंद्रकांत कारंडे संतोष पाटील योगेश खटकाळे अनिकेत सुरवसे अमोल सुरवसे सुरेश गवंड गिरीश पाटील अजित गोडसे विनायक मिसाळ आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कायमचा जय महाराष्ट्र करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह सांगोला तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

लवकरच सांगोलकरांना भेटायला येणार…!शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून तो महाराष्ट्रव्यापी परिवार आहे. या परिवारात नव्याने दाखल झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा प्रचारार्थ आपण लवकरच सांगोला तालुक्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी येत आहोत असे सूचक विधानही यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.तुम्ही आबांना आमदार करा आम्ही मंत्री करतो.गेली अनेक वर्ष मी दूर असूनही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे काम जवळून पहात आहे त्यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मजबूत शिलेदार मिळाला आहे. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष आणखी बळकट होईल यात आम्हाला शंका नाही. सांगोलकरांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करावे आम्ही नक्कीच येणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करू असा शब्दही यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दिला.