संगम ब्रँन्डी हाऊस या दुकानास नगरपालिकेची कोणतीच ना-हरकत-परवानगी नाही
विनापरवना व्यवसाय केल्याबद्दल दुकान मालकावर गुन्हा दाखल करावा सांगोला शहरवासियातून मागणी


सांगोला : सांगोला शहरातील जुनी स्टेट बँकेजवळ, स्टेशन रोडवर असलेल्या संगम ग्रॅन्डी हाऊस हे सरकारमान्य वाईन शॉप पूर्वी महात्मा फुले चौक परिसरात होते, परंतू मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे वाईन शॉप राष्ट्रीय महामार्ग व राज्यमहामार्ग पासून ५०० मीटर अंतराच्या आतमध्ये येत असल्याने ते राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंद केले होते. त्यानंतर हे वाईन शॉप सांगोला शहरातील स्टेशन रोडवरील जुन्या स्टेट बँकेजवळील जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र सदरील वाईन शॉप महात्मा फुले चौक येथून स्टेशन रोडवरील जुन्या स्टेट बँकेजवळ स्थलांतरीत करताना कायदेशीर प्रक्रिया व शासकीय नियमाप्रमाणे सदरील दुकानास व्यवसाय करणेकरिता नगरपालिकेची कोणतीही ना-हरकत, परवानगी घेतली नसल्याचे माहिती अधिकार अर्जातून निष्पन्न झालेले आहे. सदरील दुकानदाराने नगरपालिकेच्या कोणत्याही कागदोपत्राची व नियमांची पुर्तता केलेली नाही.

संगम बँन्डी हाऊस, जुन्या स्टेट बँकेजवळ, स्टेशन रोड, सांगोला या वाईन शॉपच्या दुकानास शासनाच्या नियमांनुसार सांगोला नगरपालिकेच्या ना-हरकत, परवानगी नसल्याने सदरील वाईन शॉपचे दुकान बंद करण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी लेखी तक्रार अॅड. रोहित सोनवणे यांनी सांगोला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कडे केलेली आहे.
कोणत्याही मद्य विक्री व्यवसाय करणाऱ्या दुकानास शासन् नियमानुसार स्थानिक नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असताना संगम ब्रँडी हाउस हे दुकान सध्या असलेल्या ठिकाणी सुरू करताना नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र,लगत राहत असलेल्या नागरिकांची ना हरकत तसेच स्थानिक वृत्तपत्रात सदरील दारू विक्री दुकान सुरू करणे बाबत जाहीर नोटिस प्रसिद्ध करून कोणत्याही नागरिकांची तक्रार अथवा हरकत आहे काय? याबाबतची पडताळणी केल्या शिवाय दारूविक्री दुकानास नगरपालिके कडून परवानगी दिली जात नाही,नगरपालिकेच्या परवानगी-ना हरकती शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभाग दारू विक्री करणेस परवाना देत नाही.परंतु संगम ब्रँडी हाऊसच्या बाबतीत ही कायदेशीर बंधनकारक असलेली कोणतीच प्रक्रिया केली गेली नसल्याने नगरपालिकेच्या प्रशासनाने तत्काळ हे दुकान सील बंद करून विनापरवना व्यवसाय केल्याबद्दल दुकान मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगोला शहरवासियातून केली जात आहे.