१०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी, ५ लाख ७१ हजार रुग्णांना जीवनदान
फिरत्या चाकावरचे प्रसूतीगृह, रुग्ण वाहिकेत २ हजार ३४२ बाळांचा जन्म

सांगोला : रुग्णवाहिका म्हटलं की मोठा आधार असतो. तो आधार बनण्याचे काम शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील १०८ रुग्णवाहिकेने केले आहे. अपघातासह आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णांना मोफत व जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी सुरू झालेली शासनाच्या १०८ ही रुग्णवाहिका जिल्ह्यातील लाखो लोकांना जीवनदान देणारी ठरली आहे. २०१४ पासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ३५ रुग्णवाहिकांमुळे दहा वर्षात ५ लाख ७१ हजार ७०९ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. अपघातग्रस्त किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्याने लोकांच्या दृष्टीने १०८ रुग्णवाहिकेमुळे नवसंजीवनीच मिळाली असून रुग्णांचा ऑक्सिजन बनण्याचे काम केले आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना मोफत व जलद वैद्यकीय मदत मिळावी यासाठी २०१४ मध्ये १०८ रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. सोलापूर शहरासह जिल्ह्यात ३५ रुग्णवाहिका कार्यान्वित आहेत. यापैकी दहा मिनी आयसीयू (एडव्हांस लाइफ सपोर्ट) असून, उर्वरित २५ रुग्णवाहिकांचा
समावेश बेसिक लाइफ सपोर्टमध्ये होतो. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतून ७९ हजार ८३१ गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात सुमारे २ हजार ३४२ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत झाला असल्याने १०८ रुग्णवाहिका ही फिरत्या चाकावरचे प्रसुतीगृह बनली आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मोलाची मदत झाली. २०१४ पासून ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे २३ हजार ३२६ रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातग्रस्तांना लगेचच आवश्यक प्राथमिक उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. रुग्णवाहिका आली की, अनेकांचे प्राण वाचतात, अशी लोकांची धारणा आहे. ती शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेने खरी ठरवली आहे.
गेल्या दहा वर्षात वाहन अपघात २३ हजार ३२६, ट्रामा (मोठे अपघात) १२ हजार ४७०, भाजणे ११०८, हृदयविकाराचा झटका २७९३, उंचावरून पडणे ५९३९, आत्महत्या २६८, विषबाधा ७७२०, गर्भवती महिला प्रसूती ७९ हजार ८३१, विद्युत झटका २५३, हल्ला ४६६१, वैद्यकीय ३ लाख ५४ हजार ५२७, इतर ७८ हजार ८१३, रुग्णांना व्हेंटिलेटर १५९ अशा सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख ७१ हजार ७०९ रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका लाईफलाईन ठरली आहे.
रुग्णवाहिका व्हेंटिलेटरसह अन्य आधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. त्यामुळे लोकांचे प्राण वाचविणे शक्य होत आहे. या रुग्णवाहिका ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत सेवा देत आहेत. लोकोपयोगी सेवेमुळे अनेक अपघातग्रस्त लोकांना वेळेत उपचार मिळाले. गरोदर महिलांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांना उपचार मिळाले आहेत. शहरी भागात २० मिनिटांत, तर ग्रामीण भागात ३० मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. – डॉ. अनिल काळे, जिल्हा समन्वयक, सोलापूर