आधुनिक सांगोला शहराचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष सुप्रसिद्ध डॉ. श्रीकांत भोसेकर यांचे निधन

सांगोला:आधुनिक सांगोला शहराचे शिल्पकार, अभ्यासू, लोकप्रिय लोकप्रतिनिधी, निष्णात व सुप्रसिद्ध डॉ. श्रीकांत वासुदेव भोसेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज रात्री नऊ वाजता सांगोला येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू वेळी त्यांचे वय 76 वर्षे होते. सांगोला शहरातील जुन्या डॉक्टर पैकी एक असलेले डॉ.भोसेकर यांची निष्णात डॉक्टर म्हणून सांगोला शहर व तालुक्यात मोठी ओळख होती. वैद्यकीय सेवा देताना डॉ. भोसेकर यांनी नेहमीच रुग्णांचे अचूक व योग्य निदान करून अनेक जणांचे प्राण वाचवले होते. डॉ. भोसेकर हे वैद्यकीय सेवेबरोबरच आधुनिक सांगोला शहराचे शिल्पकार देखील होते. सांगोला शहराचे ते माजी नगराध्यक्ष होते, त्यांच्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये व ते सांगोला नगरपालिकेचे बांधकाम सभापती असताना सांगोला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ओढ्यावरती असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स, आठवडा बाजारचा आवार हे सर्व डॉ. भोसेकर यांच्या कारकीर्दत व संकल्पनेतूनच करण्यात आलेले होते. गेल्या दहा वर्षापासून त्यांनी वैद्यकिय सेवा वयोमानामुळे बंद केलेली होती. डॉ. भोसेकर यांच्या निधनाने सांगोला शहरातील सामाजिक,राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सांगोला शहर वासियातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर सांगोला येथील स्मशानभूमी मध्ये उद्या बुधवारी सकाळी 10वाजता अंत्यविधी केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.