तुम्हाला साखर कारखान्याचे पत्रे सांभाळता आले नाहीत आणि एमआयडीसीच्या गप्पा करीत आहात- डॉ. अनिकेत देशमुख यांची खरमरीत टीका
तालुक्यात गेल्या ५ वर्षात निकृष्ठ कामे केलेल्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार-डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला : तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने कारखान्याचे चेअरमन झालात. तुम्हाला साखर कारखान्याचे पत्रे सांभाळता आले नाहीत आणि तुम्ही आता सांगोल्यात एमआयडीसी उभारण्याच्या बाता करीत आहात, अशी खरमरीत टीका डॉ. अनिकेत देशमुख यांनी विरोधकांवर केली.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्याप्रचारार्थ गावभेट दौरे सुरु आहेत. आज सोमवार दि.११ नोव्हेंबर रोजी देवळे, गोडसेवाडी कमलापूर, य.मंगेवडी, अनकढाळ या गावभेटीदरम्यान डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर प्रभाकर माळी, विजय राऊत, डॉ. सुदर्शन घेरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे नंदनवन करण्याचे काम केले. इथल्या पाण्याचा प्रश्न सोडविला. तालुक्यात पाणी आल्यामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. आबासाहेबांचा प्रशासनावर वचक होता. सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात होती. मागील पाच वर्षात मात्र सांगोला तालुक्याचे वाटोळे करण्याचे काम झाल्याचे दिसून येते. एक नेता शेतकरी कामगार पक्षाच्या सहकार्याने साखर कारखान्याचा चेअरमन झाला. मात्र त्यांना कारखान्याचे पत्रे सांभाळता आले नाहीत आणि ते आता तालुक्यात एमआयडीसी उभा करण्याचे स्वप्न तालुका वासियांना दाखवत आहेत. तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. काय चांगले काय वाईट याची जनतेला चांगली जाण आहे.
तालुक्यातील सर्व घटकातील बांधवांना न्याय देण्याचे काम भाई गणपतराव देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या पश्चात एका विरोधी गटातील नेत्याला तालुक्याचे नेतृत्व करायची संधी मिळाली. मात्र त्यांनी ती संधी नको ते उपद्व्याप करून वाया घालवली आहे.
यावेळी अनकढाळ ग्रामस्थांनी तालुक्यात बरीच कामे निकृष्ठ झाली आहेत.याबाबत आपण आवाज उठवावा अशी मागणी केल्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की, बर्याच ठिकाणाहून निकृष्ठ कामांबाबत वारंवार माझेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची बिले काढली गेली आहेत पण प्रत्यक्षात त्याठिकाणी रस्तेच नाही असेही प्रकार समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या विचाराचे सरकार सत्तेत येणार आहे. त्यामुळे पहिल्याच कॅबिनेटमध्ये सांगोला तालुक्यातील सर्व निकृष्ठ व बोगस कामांची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे.
निकृष्ठ दर्जाची कामे करुन सरकारची फसवणूक केलेल्या संबंधीत ठेकेदारावर कारवाई करुन लायसन्स रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत ठेका घेणार्या ठेकेदारांची किंवा कंपन्यांची पाठराखण करणार्या संबंधीत प्रशासकीय अधिकार्यांचीसुध्दा चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाईची मी मागणी करणार असल्याचे सांगत तुमच्या सर्व मागण्या या पुढील काळात पूर्ण करू असे आश्वासन दिले.